*भक्तिमय वातावरणात 'जळगाव जामोद ते शेगाव' पायदळी वारी संपन्न..!*
*११०० भाविकांचा सहभाग; 'गण गण गणात बोते'च्या गजराने आसमंत दुमदुमला...*
जळगाव जामोद (प्रतिनिधी):
श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही धर्मवीर राजे संभाजी क्रीडा मंडळ व गजानन भक्त मंडळाच्या वतीने आयोजित जळगाव जामोद ते शेगाव पायदळ वारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. ३ जानेवारी रोजी सुरू झालेला हा भक्तीचा प्रवास ४ जानेवारी रोजी सायंकाळी शेगाव मंदिरात श्रींच्या दर्शनाने पूर्ण झाला.दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी जळगाव जामोद येथील संत गजानन महाराज मंदिरात नगर प्रदक्षिणा करून पायदळ वारीचे प्रस्थान झाले. रात्रीच्या विश्रांतीसाठी पालखी अंबिका माता मंदिर (माळीखेल) येथे विसावली. येथे भाविकांनी आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला व दिनांक ४ जानेवारी रोजी पहाटे ५:०० वाजता पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली. वडशिंगी येथे चहा-पाणी, तर भेडवळ येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या पटांगणात भाविकांसाठी पोहे-नाष्ट्याची उत्तम सोय करण्यात आली होती.
या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे ठिकठिकाणी भक्तांनी दिलेली निस्वार्थ सेवा.यावेळी चिंचखेडा-तरोडा मार्गावरील नाल्यामुळे भाविकांना अडथळा होऊ नये, म्हणून भाविकांनी स्वखर्चाने जेसीपी (JCP) लावून मार्ग सुस्थितीत केला.जळगाव जामोद येथील डॉ. मंगेश बडेरे, डॉ. अतुल अंबडकार आणि डॉ. अभिजित देशमुख यांनी संपूर्ण मार्गात वैद्यकीय सेवा पुरवून भाविकांची काळजी घेतली. जानोरी येथे भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी ४:३० वाजता ही पायदळी वारी शेगाव येथील मुख्य मंदिरात पोहोचली. विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर ६०० महिला आणि ५०० पुरुष अशा एकूण ११०० भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.पायदळवारी आटोपून परतणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जळगाव जामोद आगाराच्या वतीने विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे भाविकांना सुखकर प्रवास करता आला.
"भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या या पायदळवारीने जळगाव जामोद ते शेगाव हा मार्ग गजानन महाराजांच्या जयघोषाने चैतन्यमय केला होता."

Post a Comment
0 Comments