धुळ्यात दारू तस्करांना मोठा दणका ₹30.17 लाखांची अवैध देशी दारू जप्त
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान धुळे तालुका पोलिसांनी अवैध दारू तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्री गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रकवर छापा टाकून रॉकेट ब्रँडची देशी दारू, वाहनांसह एकूण ₹30,17,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. 10 जानेवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांना पारोळा ते धुळे मार्गावरून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर, विशेष पथक तयार करून मुकटी (ता. धुळे) परिसरात सापळा रचण्यात आला.
रात्री 1 ते 2.36 दरम्यान, मुकटी गावाजवळील हॉटेल एकता परिसरात संशयास्पद ट्रक उभा करून त्यामधून दारूचे बॉक्स उतरवले जात असताना पोलिसांनी छापा टाकला. तपासादरम्यान ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू व वाहने आढळून आली.
या प्रकरणात
राकेश छगनलाल जैन (रा. धुळे),
दीपक अशोक शिंदे (रा. मोहाडी उपनगर, धुळे)
आणि सुदाम भुरा गोसावी (रा. भाटपुरा, शिरपूर)
यांना अटक करण्यात आली आहे.
या आरोपींविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई), (अ), 83 आणि 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
निवडणूक काळात अवैध दारू वितरण रोखण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे मतदारांवर परिणाम करणाऱ्या गैरप्रकारांवर मोठा आळा बसला आहे.

Post a Comment
0 Comments