पत्रकार इस्माईल शेख यांच्यावरील खोटा गुन्हा खारीज करण्यासाठी शेगांव शहर ठाणेदार यांच्याकडे सर्व संघटनाच्या पत्रकारांचे निवेदन
शेगाव, दि. ६ डिसेंबर २०२५ — शेगाव शहरातील पेठ मोहल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गोवंश जनावरे कत्तलीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि या गैरकृत्यांचा बातमीद्वारे पर्दाफाश करणाऱ्या पत्रकार इस्माईल शेख यांच्यावर दाखल खंडणी प्रकरणातील गुन्हा खारीज करण्यात यावा, या दुहेरी मागणीसाठी शेगावातील सर्व पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
पत्रकार संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संत गजानन महाराजांच्या पद पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या शेगावमध्ये सध्या अवैध कत्तलीचे प्रमाण वाढत असून पेठ मोहल्ल्यासारख्या दाटीवाटीच्या राहणीभागात चोरीची जनावरे आणून त्यांची क्रूरपणे कत्तल केली जात आहे. शहरात कुठेही परवानाधारक कत्तलखाने नसतानाही घराघरांत असे प्रकार सुरू असल्यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची भीती असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलीच्या प्रकारांचा सातत्याने पाठपुरावा करून पुराव्यानिशी बातम्या प्रसारित करणारे पत्रकार इस्माईल शेख यांच्या घरावरच संबंधितांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर उलट त्यांच्याविरोधातच खंडणीचा खोटा गुन्हा नोंदवून पोलिसांकडून कारवाई करून घेतल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे. तक्रारीतील मजकूर व परिस्थिती पाहता प्राथमिक चौकशी करूनही गुन्हा दाखल होऊ शकत होता, मात्र पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता थेट गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असे निवेदनात नमूद आहे.
पत्रकार संघटनांनी शेगांव शहर ठाणेदार यांच्याकडे केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
पत्रकार इस्माईल शेख यांच्यावर दाखल गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करून तो तत्काळ खारीज करण्यात यावा.
पेठ मोहल्ल्यात सुरू असलेले अनधिकृत घराघरातील “कत्तलखाने” तात्काळ बंद करण्यात यावेत
परिसरात CCTV बसवून पहाटेच्या सुमारास नियमित पोलिस कारवाई करावी.
रस्त्यावर उघडपणे सुरू असलेल्या गोवंश मांस विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावे.
पत्रकार संघटनांनी इशारा दिला आहे की, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात दोन समाजांत दुरावा निर्माण झाला किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर त्यास नगरपालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील.
निवेदनाची प्रत जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसिलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि शेगाव शहर पोलीस स्टेशन यांना पाठविण्यात आली आहे.

Post a Comment
0 Comments