हाळाखेड आरटीओ सीमा तपासणी नाक्यावर वाहतूक कोंडी; उपाययोजनांसाठी आंदोलनाचा इशारा
शिरपूर | प्रतिनिधी : देवेंद्र यादव (८४५९७९७२२६)
शिरपूर तालुक्यातील हाळाखेड (हाडाखेड) आरटीओ सीमा तपासणी चेक पोस्ट येथे सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, वाहनचालक तसेच रुग्णवाहिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार राजेश सराफ यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने वाहतुकीची परिस्थिती अक्षरशः “जीवावर बेतणारी” बनली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेक वेळा वाहनांच्या रांगा रामरामपर्यंत पोहोचतात. परिणामी, नागरिकांचा वेळ व इंधन वाया जात असून अत्यावश्यक सेवांतील रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा फटका बसत आहे.
वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याने प्रशासनाने तातडीने नियोजन करावे, स्वतंत्र मार्गिका, कर्मचारी संख्या वाढवणे, तपासणी प्रक्रिया सुलभ करणे यांसारख्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी राजेश सराफ यांनी केली आहे. अन्यथा, या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिक व वाहनचालकांनीही प्रशासनाकडून त्वरित निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment
0 Comments