जळगाव जामोद पोलिसांच्या नाकावर टिच्चून वनविभागाची मोठी कारवाई; ७५ लाखांचा गुटखा जप्त!
पोलिस प्रशासनाचा संशयास्पद कारभार; पत्रकारांना दुय्यम वागणूक दिल्याने संताप...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वनविभागाच्या चेक पोस्टवर वनविभागाने रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई केली. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा तब्बल ५० ते ७५ लाख रुपये किमतीचा विमल गुटखा आणि पान मसाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे. मात्र, या कारवाईनंतर जळगाव जामोद पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पोलिसांनी या प्रकरणाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना दुय्यम वागणूक दिल्याने खळबळ उडाली आहे.जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या वनविभागाच्या नाक्यावर वन कर्मचारी गस्तीवर होते. रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या एका आयशर ट्रकची (क्र. MH30 BD 7585) संशयावरून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला.वनविभागाने तत्काळ स्थानिक पोलिसांना पाचारण केले आणि ट्रक पोलीस स्टेशनला लावण्यात आला.
पोलिसांचा 'अर्थपूर्ण' कारभार आणि संशयास्पद भूमिका.
जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दररोज मोठ्या प्रमाणावर गुटख्याची अवैध वाहतूक होत असतानाही पोलीस त्याकडे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईतही पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे.
व्हिडिओ चित्रीकरणास टाळाटाळ: गाडीतून गुटखा खाली करताना संपूर्ण प्रक्रियेचे अधिकृत व्हिडिओ चित्रीकरण करणे आवश्यक असताना पोलिसांनी तसे केले नाही.
आरोपींशी जवळीक: आरोपींना कायद्यानुसार ताब्यात ठेवण्याऐवजी, ठाणेदार नितीन पाटील यांनी चक्क आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने गुटखा खाली केल्याचे समोर आले आहे.
--लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दुय्यम वागणूक--
या मोठ्या कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना जळगाव जामोद पोलिसांनी अत्यंत दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक दिली. कारवाई पारदर्शक ठेवण्याऐवजी ती दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचे दिसून आले. माहिती देण्यास टाळाटाळ करणे आणि पत्रकारांना सहकार्य न केल्यामुळे पोलीस नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नागरिकांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
तालुक्यात गुटखा माफियांचे जाळे पोलिसांच्या आशीर्वादानेच फोफावत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. वनविभागाने ही कारवाई करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन, जळगाव जामोद पोलीस प्रशासन आणि गुटखा माफियांचे असलेले लागेबांधे शोधून काढून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहेत.

Post a Comment
0 Comments